Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ चे उद्या वितरण

Admin | 6 views
‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ चे उद्या वितरण

मुंबई, दि. २१ : सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर, पत्रकार, आरोग्य कर्मचारी तसेच तळागाळातील आरोग्य घटकांचा गौरव करण्यासाठी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ या  पुरस्कारांचे वितरण तसेच महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ, ‘मेनोपॉज क्लिनिक’ उपक्रमाचे राज्यस्तरीय लोकार्पण कार्यक्रमाचे रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग वाढविणे, सेवा गुणवत्तेत सुधारणा करणे तसेच दुर्गम व वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका व क्षेत्रीय यंत्रणांच्या समर्पित कार्याचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार

आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देणे, आरोग्य विषयक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे व लोकसहभागातून आरोग्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर, पत्रकार व आरोग्य कर्मचाऱ्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

सन २०२३ ते २०२५ या कालावधीतील २३ पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात येणार असून, प्रत्येक पुरस्कारार्थीस रुपये १ लाख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाआरोग्य सन्मान २०२६

तळागाळातील आरोग्य यंत्रणेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांपर्यंत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका तसेच विविध विशेष मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम

‘उपचारांपलीकडची शासनाची साथ’ या संकल्पनेवर आधारित सार्वत्रिक पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे. कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, मज्जासंस्थेचे आजार, श्वसन विकार व वृद्धापकाळाशी संबंधित दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना शारीरिक वेदनानियंत्रण, मानसिक-सामाजिक आधार, कुटुंबीय समुपदेशन व घरपोच सेवा उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

‘मेनोपॉज क्लिनिक’ उपक्रम

महिलांच्या रजोनिवृत्ती काळातील शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य गरजांसाठी राज्यातील ५८० ठिकाणी ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून, दर बुधवारी विशेष ओपीडीद्वारे सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य सेवेत महाराष्ट्राने देशात एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.

यावेळी आरोग्य दिनदर्शिका, हॉस्पिटल व पीएचसी मॅन्युअल, जन्म-मृत्यू साहित्य, माहितीपट तसेच ‘मात्र’ (MAATR) अंतर्गत आशांसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या आरोग्यविषयक व्हिडिओचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

आरोग्य सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव, तळागाळातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान, महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल आणि मानवकेंद्री आरोग्य सेवा उपक्रमांचा प्रारंभ अशा बहुआयामी कार्यक्रमांनी सजलेला हा सोहळा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

०००

 


Join WhatsApp