Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी – मंत्री डॉ.अशोक वुईके

Admin | 11 views
आदिवासी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी – मंत्री डॉ.अशोक वुईके

मुंबई, दि. ८ : आदिवासी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशातून प्रेरणा घेऊन इतरांनीही शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी व समाजाच्या उन्नतीत मोलाचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. शासकीय निवासस्थानी आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शुभेच्छा देतांना आदिवासी  विकास मंत्री डॉ. वुईके बोलत होते.

मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग सातत्याने प्रयत्नशील असून या विद्यार्थ्यांनाही परदेशी  शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांच्या हस्ते श्रेयस पाटकर यांचा सत्कार करण्यात आला. श्रेयस पाटकर वारली समाजातील विद्यार्थी असून मूळचा उपलाट ता. तलासरी जि. पालघर येथील आहे. त्याचे शिक्षण बीएससी कॉम्प्युटर सायन्स झाले आहे. युके येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल आणि युनिव्हर्सिटी ऑफ साऊथम्प्टॉम येथे एमएससी डाटा सायन्स या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकरिता त्यांची निवड झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सुशांत आत्राम या विद्यार्थ्यांने फर्ग्युसन  कॉलेज, पुणे येथून बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून शिक्षण घेतले आहे. या विद्यार्थ्यां वेब टूल तयार केले होते त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये  करण्यात आले होते. आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी, आत्राम याचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील उपलाट येथील विवेक पडवले हा वारली समाजातील विद्यार्थी  2026 मध्ये Graduate Aptitude Test in Engineering (GATE) परीक्षेमध्ये डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांमध्ये उत्तीर्ण झाला आहे. विवेक पडवलेच्या या यशाबद्दल मंत्री डॉ. वुईके यांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील झेप अभिमानास्पद बाब असून, शासनाच्या योजनांचा लाभ घेत विद्यार्थी मोठ्या संधींपर्यंत पोहोचत असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

मोहिनी राणे/स.सं


Join WhatsApp