Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

आगामी वर्षात सीपीआरमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती राबवणार – वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ

Admin | 16 views
आगामी वर्षात सीपीआरमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती राबवणार – वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर दि :१३(जिमाका) – आगामी वर्षात शहरातील खाजगी नामवंत हॉस्पिटललाही लाजवेल अशा पद्धतीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) व्यवस्था उभारण्यात येईल.उपचार व पैशाअभावी कोणत्याही रुग्णांची हेळसांड होणार नाही .या ठिकाणी अत्यंत प्रगत उपचार पद्धती अवलंबण्यात येईल असे प्रतिपादन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शेंडा पार्क या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (CPR) कोल्हापूर येथील गट – ड च्या उमेदवारांच्या सरळ सेवा भरती नियुक्तीच्या आदेश वितरण प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी अमोल येडगे , अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.भूषण मिरजे,डॉ गिरीश कांबळे,प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप आदी उपस्थित होते.


श्री मुश्रीफ म्हणाले ,वैद्यकीय मंत्री म्हणून माझ्या दोन वर्षाच्या कालखंडात राज्यात वैदयकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल 8352 पदे भरण्यात आली असून त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे.भविष्यात राज्याच्या जीडीपीमध्ये कोल्हापूरचा वाटा निश्चित पणाने मोठा असेल.आज ज्या 83 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या सर्व उमेदवारांची नियुक्ती गुणवत्तेवर झाली आहे असे सांगून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे असे कळकळीचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले,आजचा वर्ग 4 च्या उमेदवारांच्या नियुक्तीचा कार्यक्रम म्हणजे त्या उमेदवारांच्या नोकरीची सुरुवात नसून ही बाब म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा एक महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे . उमेदवारांच्या निवडी संदर्भात पारदर्शीपणे काम करणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले . तर या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 17 हजार उमेदवारांनी अर्ज भरल्याचे डॉ.सदानंद भिसे यांनी प्रास्ताविकेत सांगूंन निवड झालेल्या उमेदवारांनी उपचार सुरु असलेल्या रुग्णांप्रती संवेदनशीलता बाळगावी असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी रोहित वरपे,अजिंक्य पाटील,स्नेहल घाडगे,धीरज तायशेटे व भरत पाटील या पाच उमेदवारांना प्रतिकात्मक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नोकरी संदर्भात नियुक्तीपत्र देण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश आजगावकर तर आभार प्रदर्शन डॉ.शिरीष मिरगुंडे यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी संबंधित उमेदवाराच्या कुटुंबीयांची तसेच महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
000000


Join WhatsApp