
मराठी बोलींच्या महोत्सवाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) : चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे होत आहेत. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला आज महाकवी कालिदास कलामंदिरात मराठी बोलींचा महोत्सव पार पडला. या महोत्सवात ‘अरे संसार संसार’ पासून ते ‘जागर शिवबा’ चा पर्यंत बोली भाषेतील कार्यक्रम सादर करण्यात आले. या महोत्सवास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

चौथे विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी बोली भाषांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. जळगाव येथील परिवर्तन संस्थेने शंभू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहिणाबाईंची गाणी व कविता यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत ‘वन्स मोअर’ची मागणी केली. या कार्यक्रमातून अहिराणी गीतांचे दर्शन घडविण्यात आले. तसेच श्री. पाटील यांनी जीवनात बोली भाषेचे महत्व विशद केले.
बोहाडा नृत्य प्रकार नाशिकचे शाहीर प्रवीण जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केला.
पुष्पा ठाकूर, राणी कुमावत, माणिक कुमावत आणि सहकाऱ्यांनी अहिराणी गीते, तर विदर्भातील नाट्य प्रकार असलेला ‘झाडीपट्टी’ हा प्रकार नरेश गडेकर व सहकाऱ्यांनी सादर केला. विशाल शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘आराधी’ लोकनृत्य आणि लोकगीते सादर केली. अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा, धाराशिव निर्मित आराधी लोकनृत्य आणि लोकगीतांमध्ये श्रीकृष्ण गीत, वासुदेवाचे पहाटेचे भक्ती गीत, विठू माऊली गीत, खंडोबाचा जागर, वाघ्या मुरळी गीत, देवीचा जागर आदी गीते सादर केली.
प्रवीण जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा, बालपण, विविध गुणांचा व कार्याचा पैलू दाखवणारे पोवाडा, गीत सादर केले.
या कार्यक्रमांना दिवसभर उपस्थित राहून नाशिककरांनी उत्स्फूर्त दाद दिली.
00000
