Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

Admin | 1 views
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली, दि. ०२: भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता जम्मू-काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील पुंछ येथे दिमाखात उभा राहणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पुणे येथून निघालेली भव्य  ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात या रथाचे आणि शिवरायांच्या पुतळ्याचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले.

या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन केले. यावेळी दिल्लीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित होते.

आयुक्त आर. विमला यांनी सांगितले की भारतीय सेना सीमेवर शौर्याने काम करत आहे. सीमेवर उभारण्यात येणारा हा पुतळा जवानांना आणि देशाला अधिक प्रेरणा देईल.

मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा हा पुतळा पुणे येथून रवाना झाला असून, त्याने पुणे – मुंबई – बडोदा – अहमदाबाद – उदयपूर – जयपूर असा प्रवास करत दिल्ली गाठली आहे. इथून पुढे हा रथ पानिपत आणि पठाणकोट मार्गे पुंछ येथे पोहोचणार आहे. या प्रवासात ठिकठिकाणी शिवप्रेमींकडून रथाचे स्वागत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, प्रतापगड यांसह युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या ११ किल्ल्यांची आणि तमिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांची माती आणि पवित्र पाणी नेण्यात येत आहे.

या स्मारकाचे आणि पुतळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचे ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांच्या तिसऱ्या पिढीतील कलाकार विपुल आणि विराज खटावकर यांनी या नऊ फूट उंच पुतळ्याची निर्मिती केली आहे. हा पुतळा उच्च दर्जाच्या फायबरपासून तयार करण्यात आला असून, त्याची रचना अत्यंत देखणी आणि प्रेरणादायी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे अशाच प्रकारे पुतळा उभारण्यात आला होता. त्यानंतर आता पुंछ येथे अधिक भव्य पुतळा बसवून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन ‘आम्ही पुणेकर’ संस्था, ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ आणि ‘श्री शिवशंभू विचार मंच’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, विश्वस्त अखिल झांजले, विपुल कांबळे आणि संदीप मते यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे. या कार्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या स्मारकाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याची सुरक्षा आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी भारतीय लष्कराच्या ‘मराठा लाइट इन्फंट्री’ (MLI) कडे सोपवण्यात आली आहे. पाकिस्तान सीमेपासून (LOC) अवघ्या ५०० मीटर अंतरावरील या ठिकाणी ५०० जवान तैनात असून, त्यांनी या स्मारकाची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. केवळ पुतळाच नाही, तर या ठिकाणी शिवरायांच्या इतिहासावर आधारित एक विशेष संग्रहालय आणि ‘लाईट अँड साऊंड’ शो देखील आयोजित करण्याचे नियोजन आहे, जेणेकरून सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आणि पर्यटकांना शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास अनुभवता येईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात या अश्वारूढ पुतळ्याचे अधिकृत अनावरण होणार असून, हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ठरणार आहे.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली


Join WhatsApp