Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 4 views
छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. १९ (जिमाका) : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या अधिपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. देव, देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यकारभारात विविध सुधारणा करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली. पाणी, जंगल यांचे नियोजन केले. भविष्यातील धोका ओळखून समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. छत्रपतींच्या कारकिर्दीत समुद्रमार्गे आक्रमण करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही, अशा शब्दात त्यांनी महाराजांचे द्रष्टेपण मांडले.

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष राज्यातील गड किल्ले देत असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधानांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून २७ देशांनी एकमताने त्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेले आहेत. शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा सेवा संघाच्या निवेदनावर राज्य सरकार सकारात्मक काम करेल, तसेच मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री फडणवीस राज्यातील आणि जगभरातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महाराजांनी जलव्यवस्था, अर्थकारण व पर्यावरण रक्षणाच्या संकल्पना चारशे वर्षांपूर्वीच राबवल्या. ‘शिवराई’ ही चलन व्यवस्था त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन अधिक वेगाने करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता व जतन मोहीम राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांप्रती महाराजांच्या संवेदनशील धोरणांचा उल्लेख करत बळीराजाला सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रीसन्मानाची परंपरा जपत ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे महिलांना सक्षम करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जुन्नर तालुका व शिवनेरी किल्ला परिसराच्या विकासाला प्राधान्य देऊन प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शिवनेरी किल्ला विचार आणि कार्याचे प्रेरणास्थळ- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने  प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.

गेल्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे. त्यापूर्वीच शिवजन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन-संवर्धनासाठी त्यांनी निधीची तरतूद केली होती. केवळ शिवनेरी किल्ल्यापुरते मर्यादित न राहता, शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यासाने घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावले उचलली होती.

गेल्या अर्थसंकल्पात आग्रा येथे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार, पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा समावेश आहे, असा संकल्प करण्यात आला होता.

किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला दिली असून त्याच विचारांवर आणि रयतेचं राज्य’ या संकल्पनेवर राज्य सरकार पुढे वाटचाल करीत आहे. शिवछत्रपतींच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम, न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासोबतच यापुढेही महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.

आमदार सोनवणे यांनीही आपले विचार व्यक्त केले.

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माँसाहेब जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रगत प्रगतशील शेतकरी स्व. पंकज वामन, खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉ. विनोद सीताराम हांडे, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे आणि उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

०००


Join WhatsApp