Pune | Sat, 25 April 2026

No Ad Available

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवा – पालकमंत्री डॉ. वुईके

Admin | 5 views
दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवा – पालकमंत्री डॉ. वुईके

चंद्रपूर, दि. २५ : विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे. शिक्षण केवळ नोकरीसाठी नाही, तर विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये भावनिक, अध्यात्मिक बुद्धिमत्ता निर्माण झाली पाहिजे. तसेच त्यांना सामाजिक भानसुध्दा असावे. कठीण आणि संकटाच्या वेळी कसा निर्णय घ्यायचा, ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडविला तर समाज आणि देशाचे भवितव्य उज्वल होईल, त्यांना घडवण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी केळकर यांच्यासह मंचावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत उन्नती वडसकर, फाल्गुनी पोतराजे आणि गायत्री बांदुरकर या विद्यार्थिनींना सुद्धा मानाचे स्थान देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या पाचव्या वर्गात माझे शिक्षण झाले, तो दिवस मला आज आठवला, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून या देशाचा राज्यकारभार सुरू आहे. जर संविधान नसते तर मी सुद्धा तुमच्यासमोर उभा नसतो. बक्षीस हा सन्मान असला तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या शिक्षकांचे व पालकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या जिल्ह्याला प्रथमच महिला जिल्हाधिकारी म्हणून वसुमना पंत लाभल्या आहेत. स्त्री केवळ शक्ती नाही, तर परिवर्तन करण्याची ऊर्जा आहे. स्त्रीचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा सन्मान आहे. या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगला बदल घडून येईल. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या नवीन कल्पनेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, सात-आठ महिन्यांपासून अतिशय चांगला उपक्रम जिल्हा परिषद मध्ये सुरू आहे. निपुण या उपक्रमामध्ये जिल्ह्याला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. यासाठी सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत घेतली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, जिल्हा परिषदेच्या पाच शाळांमध्ये रोबोटिक्स उपक्रम राबविण्यात येत आहे. सोबतच ई -चावडी वाचन सुद्धा करण्यात येते. जिल्हास्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. निपुण मध्ये जिल्ह्याची प्रगती चांगली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर यांनी केले. संचालन एकता बंडावर यांनी तर आभार विनीत मत्ते यांनी मानले.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप : जिल्हा परिषदेमार्फत पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आला. या स्पर्धेचे जिल्हास्तरीय बक्षीस वितरण पालकमंत्री अशोक वुईके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यात प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक संस्कार कारेकर, द्वितीय स्वराज नन्नावरे, तृतीय क्रमांक नैतिक कुचनकर यांनी प्राप्त केला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वी केळझरकर, द्वितीय दिव्या आरकिनवार, तृतीय श्रेयस मराठे यांनी, निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी ढूमने, द्वितीय अपेक्षा बेताल, तृतीय गायत्री बांदुरकर यांनी, वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रांजली आवारी, द्वितीय माही वासेकर, तृतीय कनिष्क कांबळे यांनी तर चावडी वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक देवांश परतेकी, द्वितीय ईश्वरी मोहुर्ले आणि तृतीय क्रमोक सोमानी गोरे यांनी प्राप्त केला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

००००००


Join WhatsApp