
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने पाऊल टाकत ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
केवळ आठवड्याभरात या उपक्रमांतर्गत एकूण 1,00,021 प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यात ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून डिजिटल प्रवासाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक 24,927 आणि इतर प्रवासी 2,219 अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून, प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
| एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती नाही
1 मार्चपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि, जोपर्यंत 80% सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी , असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे. |
भविष्यात एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी अधिक सुलभ होणार असून, भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून, प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
000
संजय ओरके/विसंअ
