
मुंबई, दि.२३: कृषी क्षेत्रातील ‘ए आय’ विस्तार हा जबाबदारी, सर्वसमावेशक आणि विश्वास यांवर आधारित असावा. ‘ए आय’ प्रणालीची गुणवत्ता ही चांगल्या डेटावरच अवलंबून असते. तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना सक्षम करण्यावर केंद्रित करणारे असावे ‘एआय’ फॉर ॲग्री २०२६ परिषदेत तज्ञांनी हे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणांतर्गत येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) दुसऱ्या दिवशीच्या सुरक्षा, पारदर्शकता आणि जोखीम व्यवस्थापन यंत्रणा॔ या विषयावर चर्चासत्र झाले.यामध्ये ‘ए.आय’ एआयसीचे पराग दाभाडे, डिजिटल इंडियाचे मुख्य कार्यकारी अमिताभ नाग, ईवायएल.एल.पी.चे वरिष्ठ भागीदार प्रकाश जयराम, केपीएमजीचे तंत्रज्ञ बृजेंद्र कुमार,युएनडीपच्या सुश्री अफरीन सिद्दीकी यांनी सहभाग घेतला.
स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक
डेटामधील विविधता याविषयी माहिती देताना अमिताभ नाग म्हणाले की, डेटामध्ये प्रादेशिक उच्चार, बोलीभाषा, स्थानिक ठिकाणांची नावे आणि संदर्भातील विशेष परिस्थिती यांचा समावेश असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही प्रणाली विकसित करतांना पूर्वग्रह टाळता येतो. वापरकर्त्यांना स्पष्ट अभिप्राय देण्याची यंत्रणा आणि प्रणालीने त्या अभिप्रायावर आधारित सुधारणा दर्शवली पाहिजे. पायलट प्रकल्पांमध्ये शब्दसंग्रह, क्षेत्र-विशिष्ट पडताळणी आणि मॉडेल ट्युनिंगद्वारे अचूकता वाढवता येते. एआय प्रणालीची अचूकता पूर्णपणे डेटावर अवलंबून असते. भारतात भाषिक विविधता मोठी असल्यामुळे ठिकाणांची नावे योग्य लिप्यंतरित करणे हे मोठे आव्हान आहे. महानगरातील उच्चार आणि ग्रामीण भागातील उच्चार वेगळे असतात, त्यामुळे स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक ठरतो. यासाठी ‘भाषिणी’सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.चॅटबॉटसारख्या प्रकल्पांत आवाजाचे ट्रान्सक्रिप्शन, मजकूर वर्गीकरण आणि अचूक प्रतिसाद यावर विशेष लक्ष दिले जाते. ‘व्हॉईस-फर्स्ट’ पद्धतीत आवाज हेच मुख्य माध्यम मानून संपूर्ण प्रणालीची रचना केली जाते.
सुरक्षा, गोपनियता, आवश्यक
यूएनडीपीच्या अफरीन सिद्दी यांनी आशिया-पॅसिफिक प्रदेशातील जबाबदार ए आय संदर्भातील शासनाच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकला.अनेक देश अजूनही त्यांच्या संदर्भानुसार ‘एआय’ चौकट विकसित करत आहेत. सुरक्षा, नैतिकता, गोपनीयता आणि शासन याबाबत सार्वजनिक संस्थांमध्ये तज्ज्ञतेचा अभाव आहे तो भरून काढला जाणे गरजेचे आहे. तुकड्यात विभागलेली डेटा प्रणालीवंचित घटकांचा डेटामध्ये आणि डिजिटल सेवांमध्ये प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे गरजेचे आहे.त्यांनी २०० गावांमध्ये राबवलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्म, नियोजन व अर्थसंकल्प प्रक्रियेसाठी नागरिक प्रशिक्षण कार्यक्रम, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ‘ए आय’ फेलोशिप यांचा उल्लेख त्यांनी केला.
ब्रिजेंद्र कुमार यांनी ‘ए आय’प्रणालींमधून उद्भवणाऱ्या जोखमींचा उल्लेख केला. एका मॉडेलचे आउटपुट दुसऱ्या मॉडेलचे इनपुट बनते, तेव्हा जबाबदारीची अस्पष्टता निर्माण होते. अपस्ट्रीम त्रुटी (उदा. हवामान अंदाजातील चूक) डाउनस्ट्रीम निर्णयांवर (कर्ज, विमा, पात्रता) परिणाम करू शकतात.
प्रकाश जयराम यांनीडिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ‘डिझाइनमधून लेखापरीक्षण’ या संकल्पनेचे स्पष्टीकरण दिले. वैयक्तिक डेटा प्रणाली ( अग्री स्टॅक ) याचे उदाहरण शेतकरी माहिती, जमीन जोडणी, हंगामी पीक डेटा हे सांगता येईल.अवैयक्तिक डेटा प्रणाली उपग्रह प्रतिमा, हवामान माहिती, भू-नकाशांकन यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
००००
संध्या गरवारे/विसंअ
