Pune | Sun, 19 April 2026

No Ad Available

कृषी निर्यातीत ‘मेड इन महाराष्ट्र’ ब्रँडची निर्मिती करावी -पणन मंत्री जयकुमार रावल

Admin | 21 views
कृषी निर्यातीत ‘मेड इन महाराष्ट्र’ ब्रँडची निर्मिती करावी -पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २४: महाराष्ट्रातील कृषी उत्पादन देशाच्या नाही, तर जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकणारे आहे. यामध्ये फळे, फुले, भाजीपाला उत्पादनाचा समावेश आहे. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी रेसिड्यू फ्री, केमिकल फ्री आणि गॅप प्रमाणपत्र आवश्यक आहे. अशा सर्व बाबींचा समावेश असलेल्या कृषी उत्पादनांच्या ‘ मेड इन महाराष्ट्र’ ब्रँडची निर्मिती करावी असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ॲग्री एक्सपोर्ट कॉन्क्लेव्हच्या समारोप कार्यक्रमात केले.

यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक तथा महाराष्ट्र अग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प संचालक विनायक कोकरे,अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.अमोल यादव, अपेडा मुंबई कार्यालयाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत वाघमारे, नॅशनल प्लॅन्ट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन कार्यालयाचे सहसंचालक डॉ. जी. पी. सिंग, मलेशियाचे कॉन्सिलेट जनरल अहमद युसुफ, श्रीलंकेचे कॉन्सिलेट जनरल शिरानी अरियारत्ने उपस्थित होते.

या कार्यशाळेत फळे, फुले, भाजीपाला व अन्नधान्य यांची विविध देशात निर्यात करणारे ८९ निर्यातदार उपस्थित होते.

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, कृषी उत्पादने विविध देशांमधील बाजारपेठेत जाण्यासाठी ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ धोरणानुसार निर्यातदारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपली कृषी उत्पादने ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी नवीन बाजारपेठेंचा शोध घेण्यात येत आहे. शेतमालाची ‘फार्म टू फॉरेन मार्केट’ अशा पद्धतीने मूल्य साखळी विकसित करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

कृषी निर्यातदारांनी जागतिक पातळीवर टिकेल अशा पद्धतीने कृषी मालाचे उत्पादन संवर्धन व वाहतूक व्यवस्था निर्माण करून जगात कृषी निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव करावे असे आवाहनही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केले.

आमदार चरण सिंग ठाकूर यांनीही विचार व्यक्त केले. पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी आभार मानले.

ॲग्री एक्सपोर्ट कोन्क्लेव्हमध्ये ८९ निर्यातदारांनी सहभाग घेतला. परिषदेत आंबा व भाजीपाला उत्पादक संघाचे उपाध्यक्ष इकराम हुसेन, महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, कांदा निर्यातदार अजित शाह, केळी निर्यातदार किरण डोके यांनीही मते व्यक्त केली. परिषदेला निर्यातदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ

 


Join WhatsApp