
मुंबई, दि. २३ : कृषी क्षेत्रातील हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि उत्पन्नातील अनिश्चितता या आव्हानांवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रभावी ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर एआयच्या साहाय्याने जागतिक स्तरावर कृषी संशोधन नेटवर्क उभारण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’(एआय फॉर ॲग्री २०२६) या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जागतिक कृषी संशोधन नेटवर्क उभारणी या विषयावर झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर बी. वेंकटेश्वरलू यांनी या परिसंवादाचे समन्वयन केले.
या परिसंवादामध्ये कृषी आयुक्त सूरज मांढरे, नवोन्मेष कार्यालयाचे संचालक व्हिन्सेंट मार्टिन, नेदरलँड्स येथील द हेग, अॅग्ट्युअलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम सरबजना यांनी विचार मांडले. हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पाण्याचे नियोजन, हवामानाचा अंदाज आणि पिकांच्या गरजांनुसार संसाधनांचा अचूक वापर करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच, हवामान-सहनशील नवीन वाणांच्या संशोधनात ‘एआय’ मोठी मदत करू शकतो. राज्य शासनाने ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह शेतकरी-केंद्रित धोरण स्वीकारले असून, अनेक स्टार्टअप प्रस्तावांमधून केवळ उपयुक्त, परवडणारे व विस्तारयोग्य प्रकल्प निवडले आहेत.राज्यात मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा, शेतकरी ओळख प्रणाली आणि ‘महाविस्तार’सारखे प्लॅटफॉर्म तयार असून, आता डेटा-सामायिकरण, सहयोगी संशोधन, धोरणात्मक सुधारणा आणि शिक्षणात ‘एआय’चे मुख्यप्रवाहीकरण होत असून सर्वांनी एकत्र येऊन ज्ञान, संसाधने व सर्वोत्तम पद्धती शेअर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सकारात्मक बदल घडवता येईल, असा विश्वास कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.
कृषी संशोधन व नवकल्पनांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याची गरज व्यक्त करताना नवोन्मेष कार्यालयाचे संचालक व्हिन्सेंट मार्टिन यांनी सांगितले की, २०२६ मध्येही कृषी संशोधन यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता युगाशी पूर्णपणे सुसंगत झालेल्या नाहीत. हवामान बदल, साथीचे रोग यांसारख्या वाढत्या आव्हानांसमोर पारंपरिक संशोधन ते प्रत्यक्ष अंमलबजावणी हा कालावधी अजूनही १५ ते २५ वर्षांचा असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ही कमी इंटरनेट सुविधा, स्थानिक भाषा आणि अल्प साक्षरता असलेल्या भागांनाही अनुकूल असावी. कृषी विद्यापीठांनी कृषीशास्त्राबरोबरच ‘एआय’, डेटा गव्हर्नन्स आणि समावेशक डिझाइन यांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. पुढील आंतरराष्ट्रीय संवाद मे महिन्यात रोम येथे आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये जबाबदार आणि नैतिक एआय वापरासाठी जागतिक भागीदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या परिसंवादामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने जागतिक स्तरावर कृषी संशोधनाचे नेटवर्क उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. संशोधन संस्था, शासकीय यंत्रणा आणि खासगी क्षेत्र यांच्यातील सहकार्य कसे वाढवता येईल याबाबत तज्ज्ञांनी चर्चा केली.
‘एआय फॉर एआर’ नेटवर्कमध्ये सहभागी होण्यासाठी सामंजस्य करार
कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च (एमसीएईआर), पुणे आणि आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (आयक्रिसॅट) यांच्यात ‘एआय फॉर एआर’ नेटवर्कमध्ये सहभागी होण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या वतीने करण्यात आला असून कृषी संशोधनात एआयचा वापर वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
एमसीएईआर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खडगपूर यांच्यातही ‘एआय फॉर एआर’ नेटवर्कसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे कृषी संशोधन, डेटा विश्लेषण आणि तांत्रिक नवकल्पनांना नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
0000
गजानन पाटील/विसंअ
