Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

कातकरी आदिवासी बांधवांना घरकुलाचा लाभ द्या – आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके

Admin | 18 views
कातकरी आदिवासी बांधवांना घरकुलाचा लाभ द्या – आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके

मुंबई, दि. ११: केंद्र शासनाने आदिम जमातींच्या विकासासाठी २०२३ मध्ये ‘पीएमजनमन योजना’ सुरू केली आहे. यामध्ये कातकरी समाजाच्या लाभांचाही समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कातकरी आदिवासी बांधवांसह राज्यातील सर्व कातकरी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी दिले.

कातकरी समाजाच्या घरकुलाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेताना मंत्री वुईके बोलत होते. बैठकीला आमदार उमा खापरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार स्नेहा दुबे, अपर आदिवासी आयुक्त गोपीचंद कदम, आदिवासी विकास विभागाचे सहसचिव शेळके, ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, माजी आमदार विवेक पंडित, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सहभाग घेतला.

आदिवासी विकास मंत्री अशोकवुईके म्हणाले, कातकरी समाजाच्या घरकुलासाठी २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. यामध्ये घरकुलाचे बांधकाम, शौचालयाची निर्मिती आदींचा समावेश असतो. शहापूर तालुक्यातील कातकरी आदिवासी बांधवांना शौचालयाची आणि रोजगार हमी योजनेचे रक्कम मिळालेली नाही. याबाबत संबंधित विभागाने तत्परतेने कार्यवाही करून कातकरी आदिवासी बांधवांना हा लाभ उपलब्ध करून द्यावा.

ज्या आदिवासी कातकरी समाज बांधवांकडे घरकुलासाठी जागा नाही, अशा आदिवासी बांधवांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने याबाबत विशेष कार्य प्रणाली तयार करावी. कुणीही कातकरी आदिवासी बांधव शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. समस्त कातकरी समाजासाठी मिळणारे लाभ विहित कालावधीत न मिळाल्यास याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यावेळी म्हणाले.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

 


Join WhatsApp