
आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
नाशिक, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारपासून (२७ फेब्रुवारी) सुरू होत आहे. या संमेलनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्फत दरमहा प्रकाशित करण्यात येत असलेल्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकासह विविध विभागांची दालने नागरिकांना माहिती देण्यासाठी सज्ज झाली आहेत. एकूण ३३ विषयांवरील दालने या प्रांगणात सजली आहेत. या दालनांच्या माध्यमातून राज्याचा इतिहास, भाषा, संस्कृती, साहित्य, विज्ञान, कृषी, सामाजिक विकास, कौशल्यविकास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी, संशोधक, विद्यार्थी व पर्यटकांनी या दालनांना अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या दालनांमध्ये पुढील विषयांवरील माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे .
1. ऐतिहासिक वारसा स्थळे – महाराष्ट्रातील किल्ले, लेणी, स्मारके, पुरातत्त्व वारसा व जतन कार्याची माहिती.
2. पुराभिलेखागारातील मराठी – दुर्मिळ दस्तऐवज, हस्तलिखिते व ऐतिहासिक नोंदींमधील मराठी भाषेचा विकास.
3. दिव्यांग सक्षमीकरण – दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या योजना, साधने व पुनर्वसन उपक्रम.
4. मुद्रण-प्रकाश – मराठी मुद्रण परंपरा, प्रकाशन क्षेत्राचा इतिहास व आधुनिक तंत्रज्ञान.
5. ग्रंथालय विश्व – सार्वजनिक व डिजिटल ग्रंथालये, वाचन संस्कृती व ज्ञानसंपदा.
6. संवाद माध्यमे- पारंपरिक ते आधुनिक माध्यमांपर्यंत मराठीतील प्रसारमाध्यमांचा प्रवास.
7. संस्थात्मक साहाय्य- बार्टी, आर्टी- सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक व कौशल्य योजनांची माहिती. तसेच बार्टी व आर्टी मार्फत राबविले जाणारे उपक्रम व योजना
8. संस्थात्मक साहाय्य – सारथी, महाज्योती – विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा सुविधा, सारथी व महाज्योती
9. अमृत -शहरी विकास, पायाभूत सुविधा व जीवनमान उन्नती कार्यक्रमांची माहिती.
10. संस्कृती, मराठी भाषा, साहित्य व सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन उपक्रम
11. दादासाहेब फाळके चित्रनगरी दालन – मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास व योगदान.
12. महासंस्कृती – महाराष्ट्राची विविध सांस्कृतिक परंपरा, लोककला व उत्सव.
13. हिरकणी दालन – शौर्य, स्त्रीशक्ती व प्रेरणादायी ऐतिहासिक कथांचे दर्शन.
14. खाद्यसंस्कृती – महाराष्ट्रातील प्रादेशिक पारंपरिक खाद्यपदार्थ व पाक संस्कृती.
15. हस्तकला – पारंपरिक कलाकुसर, ग्रामीण कारागिरांचे उत्पादन व कौशल्य.
16. बोलीभाषा – राज्यातील विविध प्रादेशिक मराठी बोलींचे जतन व वैशिष्ट्ये
17. पर्यटन – धार्मिक, नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळांची माहिती.
18. बृहन्महाराष्ट्र मंडळ, आंतरराष्ट्रीय मंच व साहित्यिकांचे स्वाक्षरी दालन- जागतिक स्तरावरील मराठी साहित्य चळवळीची माहिती.
19. कृषी, पशुसंवर्धन व कृषी पूरक उद्योग – आधुनिक शेती तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय व पूरक उद्योग.
20. जलसंधारण योजना व आधुनिक तंत्रज्ञान – पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन व जलसंवर्धन उपाय.
21. उद्यमात सकल समृद्धी – उद्योग, स्टार्टअप व स्वयंरोजगार संधींची माहिती.
22. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ – ग्रामीण उद्योग, स्वदेशी उत्पादने व रोजगार निर्मिती.
23. विज्ञान, तंत्रज्ञान व मूलभूत विज्ञान – वैज्ञानिक प्रगती, संशोधन व नवनवीन तंत्रज्ञान
24. वस्त्रोद्योग – पारंपरिक ते आधुनिक कापड उद्योग व उत्पादन प्रक्रिया, पूरक घटक
25. तंत्रशिक्षण, तंत्रज्ञान व मराठी भाषा – तांत्रिक शिक्षणातील मराठीचा वापर व डिजिटल साधने.
26. ग्रामविकास – ग्रामीण पायाभूत सुविधा, स्वच्छता व विकास योजनांची माहिती.
27. आदिवासी विकास विभाग – आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योजना व विविध उपक्रम.
28. शबरी – एक आदर्श चळवळ – आदिवासी सक्षमीकरण व सामाजिक परिवर्तनाचे उदाहरण.
29. कचरा लाखमोलाचा – कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर व पर्यावरण संरक्षण.
30. कौशल्यम् बलम् मंडपम् – कौशल्यविकास कार्यक्रम व प्रशिक्षण सुविधा.
31. कौशल्य ते करिअर – कौशल्याधारित रोजगार व करिअर मार्गदर्शन.
32. पारंपरिक ते नवयुगीन कौशल्य – पारंपरिक कौशल्यांचे आधुनिकीकरण व उद्योगाशी जोड.
33. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक – क्रीडा विकास योजना, प्रशिक्षण व सुविधा.
लोकराज्य मासिकाचे दुर्मिळ अंक पाहण्याची वाचकांना सुर्वण संधी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्फत प्रकाशित केले जाणारे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र, महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकाचे दालन जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत संमेलनस्थळी उभारण्यात आले आहे. या दालनामध्ये लोकराज्य मासिकाचे सन 1964 पासूनचे दुर्मिळ, विशेष अंक ठेवण्यात आले असून वाचकांना हे अंक पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या दालनास भेट देण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
00000
