Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

Admin | 1 views
महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधानभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य कराराच्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या कुलगुरू व अध्यक्षा प्रा.एव्हलिन वेल्च, ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या मुख्य संचालन अधिकारी लुसिंडा पार, संचालक ज्युलिया हॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन दामेरा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणे ही अभिमानाची बाब आहे. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शासन आणि अकॅडेमिया एकत्र आले तर आपण नक्कीच उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण

 या करारानुसार ‘मुख्यमंत्री व ब्रिस्टॉल विद्यापीठ शिष्यवृत्ती योजना’ संयुक्तपणे विकसित व राबविण्यात येणार आहे. सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी 100 टक्के शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. या शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पसकडून उचलण्यात येणार आहे.

000

संजय ओरके/विसंअ

 

 


Join WhatsApp