
मुंबई,दि. २५ : वैद्यकीय परिषदेवरील नऊ सदस्यांच्या निवडीकरिता २६ एप्रिल, २०२६ रोजी निवडणुकांचे आयोजन राज्यात करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नोंदणीकृत व नोंदणीचे नूतनीकरण केलेले सुमारे १,४०,००० मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील तरतूदीनुसार वैद्यकीय परिषदेतील नऊ सदस्यांची निवड ही राज्यातील नोंदणीकृत व नोंदणीचे नुतनीकरण केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांमार्फत करण्यात येते.
या निवडणुकीकरीता राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणांतर्गत निवडणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय निवडणूक केंद्र व मतदारयादी यांचा तपशील महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या वेबसाइटवर (www.maharashtramedicalcouncil.in) उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. २६ एप्रिल, २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीकरीता मतदानाची वेळ सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० अशी आहे. मतमोजणीचे नियोजन २९ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता पासून मतमोजणी संपेपर्यंत हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ येथे करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने प्रसिद्धपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
