
नाशिक, दि. २४ (जिमाका वृत्तसेवा) : ‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक शहरात 27, 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 या कालवाधीत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. तीन दिवस सुरू राहणाऱ्या या संमेलनाची सुरुवात गुरुवार २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता मराठी बोलींच्या महोत्सवापासून होणार आहे. अशी माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रक डाॅ उदय सामंत यांनी दिली.
शुक्रवार 27 फेब्रुवारी, 2026 रोजी दुपारी 3 वाजता विश्व मराठी संमलेनाचे उद्घाटन आणि मराठी भाषा विभागाचे पुरस्कार वितरण समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र शासन विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नाशिक शहरातील साहित्यप्रेमी, वाचक व लोकप्रतिनिधींनी या संमेलनास उपस्थित राहवे, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तथा चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी केले आहे.
मराठी विश्व संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर शांतिब्रह्म, गुरूवर्य मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमलेनाच्या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येईल. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार उपस्थित राहतील.
या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन, नव्या पिढीत भाषेबाबत अभिमान निर्माण करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचा वापर वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. जागतिक पातळीवर विखुरलेल्या मराठी बांधवांना एकत्र आणून मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा ठरविणे हे संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
संमेलनादरम्यान विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्याने, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शने आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला आणि लोकपरंपरेचे वैभव या माध्यमातून अधोरेखित केले जाणार आहे. तसेच परदेशातील मराठी संस्थांशी संवाद साधत मराठीच्या डिजिटल भविष्यासंदर्भात आणि अनुवादाच्या माध्यमातून मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचविण्याबाबत विचारमंथन होणार आहे.
संमेलनाच्या आयोजनासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने व्यापक तयारी सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संमेलनामुळे नाशिक शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल तसेच सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.
असे आहेत कार्यक्रम…
पूर्वसंध्या गुरुवार 26 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी बोलींचा महोत्सव
स्थळ- महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह (दादासाहेब फाळके रंगमंच)
सकाळी 8-30 ते 9-15 : मराठी बोलींच्या महोत्सवाचे उद्घाटन : मान्यवरांचा सत्कार. सहभाग मधु मंगेश कर्णिक, डॉ. सदानंद मोरे, डॉ. मिलिंद जोशी, ॲड. नितीन ठाकरे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी.
सकाळी 9-30 ते 11 वाजेपर्यंत अरे संसार संसार (बहिणबाईंची गाणी व कविता),
सकाळी 11-15 ते 12-15 वाजेपर्यंत बोहाडा (मुखवटा नृत्ये)
दुपारी 12-30 ते 1 वाजेपर्यंत अहिराणी गीतांचा कार्यक्रम
दुपारी 1-30 ते 3 वाजेपर्यंत झाडीपट्टी (विदर्भातील नाट्यप्रकार)
दुपारी 3-30 ते 5 वाजेपर्यंत आराधी लोकनृत्य आणि लोकगीते
दुपारी 5-30 ते 7-30 पर्यंत जागर शिवबाचा
रात्री 9 ते 11 पर्यंत शिकायला गेलो एक (नाटक)
शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026
- स्वातंत्र्यवीर वि.दा.सावकर- मुख्य मंच
स्थळ- मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक
सकाळी 9 ते 11-30 पर्यंत शोभायात्रा मार्ग – कवी कुसुमाग्रज यांचे निवासस्थान-जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे-के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे रावसाहेब थोरात सभागृह येथे समारोप.
दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उद्घाटन समारंभ- मराठी भाषा गौरव दिन-पुरस्कार वितरण.
सायंकाळी 5-30 ते 6-30 पर्यंत पुरस्कारार्थींचे चर्चासत्र, संवादक-पिऊताई शिरवाडकर, सहभाग- मधु मंगेश कर्णिक, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. दिलीप धोंडगे, विनोद कुलकर्णी.
सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत राहुल देशपांडे यांचा सांगितीक कार्यक्रम (संगीत रजनी)
शनिवार दि. 28 फेब्रुवारी 2026
- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर- मुख्यमंच
स्थळ- मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक
सकाळी 9 ते 9-45 वाजेपर्यंत मनाचे श्लोक, सहभाग-शालेय विद्यार्थी.
सकाळी 10 ते 11-30 पर्यंत पालखी व जाखडी.
सकाळी 11-45 ते 1-15 पर्यंत माध्यमातील मराठी भाषा, सहभाग- पराग करंदीकर (महाराष्ट्र टाइम्स), साहिल जोशी (आज तक), मिलिंद बल्लाळ (ठाणे वैभव), नीलेश खरे, (साम मराठी), कमलेश सुतार (झी 24 तास), दीप्ती राऊत (दिव्य मराठी). संवादक- भूषण करंदीकर.
दुपारी 1-30 ते 3-30 पर्यंत स्वराज्य आख्यान.
दुपारी 3-45 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परिसंवाद-सांस्कृतिक विश्वातील मराठी भाषा, सहभाग पुरुषोत्तम बेर्डे, सचिन गोस्वामी, विजय केंकरे, अशोक हांडे, नागराज मंजुळे, सविता मालपेकर. संवादक-प्रवीण तरडे.
सायंकाळी 5-15 ते 6-30 वाजेपर्यंत समाजमाध्यमांवरील मराठी प्रभावक व्यक्तींचे चर्चासत्र, सहभाग मंगाजी काकड, धनंजय पोवार, आर.जे. सोहम, सूरज चव्हाण, आलोक राजवाडे (भाडीपा), संवादक-भूषण करंदीकर.
सायंकाळी 7 ते रात्री 10 अभिमान मराठी – अभिजात मराठी, सहभाग नंदेश उमप, सुभाष नकाशे व इतर कलाकार.
- शनिवार दि. 28 फेब्रुवारी 2026
- शाहीर वामनदादा कर्डक मंच (रावसाहेब थोरात सभागृह) सकाळी 10 ते 11-30 वाजेपर्यंत मराठी माध्यम शाळा सक्षमीकरण, उपस्थिती- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, दत्तात्रय वारे, केशव गावित. संवादक- भास्कर डोके.
दुपारी 12 ते 1.30 वा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) मराठीतील वापर, सहभाग संतोष साळवी (राज्य प्रतिनिधी, आमदार अमेरिका), डॉ.बी.जी शेखर (निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक), अतुल कहाते, सचिन जोशी, सुनील खांडबहाले, वैभव शेळके. संवादक- योगेश शुक्ल.
दुपारी 2.30 ते 4 वाजेपर्यंत, मराठी प्रकाशनाचे बदलते प्रवाह, सहभाग सुषमा दातार (आपटे ग्रंथालय, इचलकरंजी), लतिका भानुशाली (ग्रंथाली प्रकाशन), दीपक पटवर्धन, प्रकाश पारखी (बालसाहित्य). संवादक- शुभदा फडणवीस (नागपूर).
दुपारी 4 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चर्चासत्र, आंतराष्ट्रीय मंच, सहभाग सचिन गांजापूरकर, मनोज कुलकर्णी, मीनल रेणावीकर, अमित वाईकर, राहुल उरणकर. संवादक- मेघना साने (ठाणे).
सायंकाळी 5.30 वा आंतराष्ट्रीय मंच/ बृहन महाराष्ट्र मंडळ सादरीकरण, सहभाग देव कार्लेकर, मेघना वर्तक, नीलम नांदेडकर, प्रचिती तलाठी - रविवार दि. 1 मार्च 2026
- स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर- मुख्यमंच
स्थळ- मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. महाविद्यालय, गंगापूर रोड, नाशिक
सकाळी 8 ते 8.45 वाजेपर्यंत, मल्लखांब प्रात्यक्षिके, सादरीकरण उदय देशपांडे, निवेदन-मृण्मयी भजक.
सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत, मराठी बालसाहित्य, निवेदन-मृण्मयी भजक.
सकाळी 11.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत, समृद्ध मराठी भाषा, सहभाग- नितीन बानुगुडे पाटील (इतिहासातील मराठी), प्रमोद महाराज जगताप (अध्यात्मातील मराठी), संजय उपाध्ये (व्यवहारातील मराठी). निवेदन- शुभदा फडणवीस.
दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत, नव्या जुन्यांचे कवी संमेलन, सहभाग- अरुण म्हात्रे, तुकाराम धांडे, प्रकाश होळकर, गुंजन पाटील, प्रशांत मोरे, केशव खटिंग.
सायं 5 ते 6.30 वाजेपर्यंत समारोप सोहळा- कलारत्न पुरस्कार वितरण, निवदेन- मुण्मयी भजक.
सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत द फोक आख्यान.
रविवार दि. 1 मार्च 2026
शाहीर वामनदादा कर्डक मंच (रावसाहेब थोरात सभागृह)
सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत, मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग, सहभाग प्रा.राम शिंदे (सभापती, महाराष्ट्र विधान परिषद), मा.राहुल नार्वेकर (अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा),
मा. डॉ. नीलमताई गो-हे (उपसभापती ,महाराष्ट्र विधान परिषद), मा.विश्वास नांगरे पाटील ( अतिरिक्त पोलीस महासंचालक), संवादक-अभिजित ब्रह्मनाथकर.
दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत, अभ्यासक्रमातील मराठी भाषा, सहभाग- डॉ. सुरेश गोसावी ( कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ, पुणे), रवींद्र कुलकर्णी ( कुलगुरू, मुंबई विद्यापीठ), डॉ. संजीव सोनवणे (कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक), डॉ. अविनाश आवलगावकर (कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर), डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्च शिक्षण विभाग).
दुपारी 2.30 ते 4 वाजेपर्यंत, मराठी चित्रपटातील आधुनिकीकरण, सहभाग डॉ. जब्बार पटेल, कुमार सोहोनी, महेश मांजरेकर, संतोष रासकर.
रविवार दि. 1 मार्च 2026
समारोप सोहळा…
रविवार 1 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता चौथ्या विश्व मराठी संमलेनाचा सांगता समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, डॉ. जब्बार पटेल यांच्यासह लोकप्रतिनधी यांची उपस्थिती राहील. विश्व मराठी संमेलन कलारत्न पुरस्कार संगीतकार अजय आणि अतुल गोगावले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल.
या समारंभास लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कवी, संशोधक, कलाकार, उद्योजक व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
00000
