Pune | Fri, 17 April 2026

No Ad Available

नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 16 views
नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही विश्वबंधुत्वाची आणि शांती प्रस्थापित करणारी आहे. आपल्या संस्कृतीला नवकार महामंत्र निश्चितच सर्वव्यापी करतो. नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणची शक्ती असून विश्वशांतीसाठी या महामंत्राच्या जपाचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्यावतीने विश्व नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमाचे आयोजन वरळी येथील एनएससीआय डोममध्ये करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर आचार्य परम सागर महाराज, निरंजन सागर महाराज, सौम्य सागर महाराज, मानव कोठारी, भगवत कोठारी, आशिष शहा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.  फडणवीस म्हणाले, या जगामध्ये सर्व सजीव प्राणी ही सृष्टीचे मुले आहेत. सर्वांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. ‘जिओ और जीने दो’ हे आपले तत्व जैन विचारांमधून प्रतिपादित होते. विश्व कल्याणसाठी यापेक्षा दुसरा विचार असूच शकत नाही. नवकार मंत्र हा अशा विचारांना पुढे नेण्यास मदत करतो. नवकार मंत्राच्या जपातून पाप शुद्धी होऊन सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा मिळते. या महामंत्राच्या सामूहिक जपाने संपूर्ण विश्वाच्या शांतीसाठी एक महायज्ञ सुरू आहे. या मंत्रामुळे नवजीवन आपल्याला प्राप्त होते.

नवकार मंत्राच्या माध्यमातून पाच तत्वांना आपण नमस्कार करतो. सर्व जगाला यातून आपण नमस्कार करीत असतो. मंत्राच्या जपाने अरिहंत परिस्थिती निर्माण होते. तीर्थंकरांची अवस्था ही अरिहंताची आहे. या मंत्राच्या जपाने जगामध्ये असलेल्या सर्व सकारात्मक शक्ती आपल्याशी जोडल्या जातात. हा मंत्र केवळ व्यक्तीच्या विचारांनाच शांती देत नाही, तर ‘इनर सेल्फ’ लासुद्धा शांती देतो. विश्वशांतीचा विचार देणाऱ्या, आनंद देणारा , सकारात्मक शक्तींना जोडणाऱ्या या मंत्राचा जप विश्व कल्याणासाठी फलदायी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.

जैन समाज प्रत्येक जीव, जंतू, प्राणी यांचा विचार करणारा असून भूतदया आणि प्राणी सेवा ही समजात केली जाते. प्राणीसेवेचा विचार केवळ शब्दांमध्ये न ठेवता प्रत्यक्ष वास्तविकतेत जैन समाजामध्ये आणला जातो, असे गौरवोद्गार ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. कार्यक्रमाला जैन समाजातील आचार्य, मुनी, उपाध्यय, साध्वी व जैन समाज बांधव उपस्थित होते.
000000

 

 


Join WhatsApp