Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कृषी परिवर्तनाचा नवा अध्याय; ‘एआय ॲग्री २०२६ परिषदेत जागतिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Admin | 1 views
प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कृषी परिवर्तनाचा नवा अध्याय; ‘एआय ॲग्री २०२६ परिषदेत जागतिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुंबई, दि. 23 :  शेती आणि अन्न प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे. ‘दूरसंवेदन व भू-स्थानिक बुद्धिमत्ता यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कृषी परिवर्तन’ या विषयावर झालेल्या चर्चेत देशातील आणि परदेशातील दिग्गज मान्यवरांनी विचार मांडले.

मुंबई येथे आयोजित ‘एआय ॲग्री 2026: शेतीचे भविष्य घडविताना’ या दोन दिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, ‘प्रगत तंत्रज्ञानावर आधारित महत्त्वपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते महालनोबिस राष्ट्रीय पिक अंदाज केंद्राचे संचालक डॉ. सौम्य बंद्योपाध्याय यांनी उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या डेटाचा वापर करून पिकांचा अचूक अंदाज कसा वर्तवता येतो, यावर प्रकाश टाकला. एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक येथील जिओइन्फॉर्मेटिक्स सेंटरचे संचालक डॉ. मंजुल कुमार हजारिका यांनी आशियाई स्तरावरील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या यशस्वी प्रयोगांची माहिती दिली.

सत्रात सहभागी झालेल्या इतर वक्त्यांनी तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक अंमलबजावणीवर भर दिला. सोल्यूशन्स व ग्राहक यश, क्रॉपइनचे उपाध्यक्ष गौतम कराळगी यांनी डेटा-आधारित शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत होणाऱ्या वाढीचा नकाशा मांडला.

व्हॅल्यू चेन, डेटा ई-रजिस्ट्रीचे सह-संस्थापक व प्रमुख तरुण काटोच यांनी कृषी मूल्य साखळीत पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट केली. कृषी व शाश्वतता, गुगल-डीपमाइंडचे संस्थापक व प्रमुख आलोक तळेकर  यांनी जागतिकस्तरावर ए आयच्या माध्यमातून शेती शाश्वत कशी करता येईल, यावर तांत्रिक विश्लेषण केले. वासार लॅब्सचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलेश कुमार यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या स्थानिक स्तरावरील उपयोगांबाबत माहिती दिली.

या परिषदेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे धोरण आखण्यात येत आहे. या सत्रात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि धोरणकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृषी परिवर्तनाच्या या प्रवासात सहभाग नोंदवला. कृषी विभागाचे संयुक्त संचालक गणेश घोरपडे यांनी आभार मानले.

000000

श्रीमती संध्या गरवारे/सं.स


Join WhatsApp