Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

Admin | 18 views
पत्रकारांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

शिर्डी दि. ८ : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. बदलत्या परिस्थितीत वास्तवाचे भान ठेवून पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे सुरू करण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

शिर्डी येथे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची दोन दिवसीय  बैठक सुरू आहे.  यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे यांनी समिती सदस्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंग राज्य समिती सदस्य नवनाथ दिघे, प्रकाश कुलथे, नाशिक विभागीय समितीचे अध्यक्ष सुधीर लंके तसेच राज्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे म्हणाले, सर्वांना न्याय देण्याचे काम पत्रकार करत आहेत. या क्षेत्राचे महत्त्व अबाधित ठेवाण्यासाठी पत्रकारितेतील मूल्ये टिकवून ठेवण्याची गरज आहे. भविष्यकाळातील गरजा, निकड, पत्रकारांच्या गरजा ओळखून समितीने त्यासाठी पाठपुरावा करावा, त्यासंदर्भात आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

बदलत्या परिस्थितीत आता प्रत्येक नागरिक हा पत्रकार झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. अशावेळी, पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणे, वंचिताना न्याय देण्याचे काम सुरू ठेवावे, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी समितीच्या कामकाजाची माहिती दिली. नागपूर येथील विधानभवन अधिवेशन काळ वगळता इतर वेळी बंद असते. अशावेळी त्याठिकाणी स्थानिक स्वराज संस्था देशपातळीवर प्रशिक्षण केंद्र असावे आणि तिथेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विधानपरिषद सभापती प्रा.  शिंदे यांच्या हस्ते महिला दिनानिमित्त राज्य अधिस्वीकृती समिती सदस्या सविता हरकरे आणि नेहा पुरव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. मुळे यांनी आभार व्यक्त केले.

0000


Join WhatsApp