Pune | Fri, 24 April 2026

No Ad Available

पु.ल. कट्ट्यावर उद्या (दि. २४) विदुषी अन्नपूर्णा देवी यांना मानवंदना

Admin | 6 views
पु.ल. कट्ट्यावर उद्या (दि. २४) विदुषी अन्नपूर्णा देवी यांना मानवंदना

मुंबई, दि. २३ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून आयोजित ‘पु. ल. कट्टा’ या कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठावर २४ एप्रिल २०२६ रोजी ‘ए-६ आकाशगंगा’ या विशेष लघुपटाचे आयोजन होणार आहे.

सूरबहार वादिका विदुषी अन्नपूर्णादेवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अन्नपूर्णादेवी फाउंडेशनच्या वतीने एक लघुपट प्रस्तुती आयोजित करण्यात आली असून, त्यांच्या विचारांची आणि गुरुतत्त्वाच्या आचरणाची उजळणी या कार्यक्रमातून केली जाणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अत्यंत मितभाषी पण अतिशय प्रतिभावान कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्नपूर्णादेवी यांच्या योगदानाला या कार्यक्रमातून  अभिवादन केले जाणार आहे.

या कार्यक्रमात ‘ए-६ आकाशगंगा’ हा लघुपट दाखविण्यात येणार असून त्याचे  दिग्दर्शन निर्मल चंदर यांनी केले आहे. अन्नपूर्णादेवी यांच्या जीवनातील महत्त्वाचे पैलू, त्यांची साधना, गुरू-शिष्य परंपरेतील त्यांचे स्थान आणि संगीताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन या लघुपटातून प्रभावी पद्धतीने मांडण्यात आला आहे. यासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, शिस्त आणि अध्यात्मिकतेचा प्रभाव यावरही प्रकाश टाकला जाणार आहे.

या लघुपटासोबतच ज्येष्ठ गायक पं. अमरेंद्र धनेश्वर आणि डॉ. सुनील शास्त्री अन्नपूर्णदेवींच्या कार्याबद्दल आपले विचार मांडणार असून, विदुषी माधवी नानल या सूत्रसंचालन करणार आहेत. तसेच बासरीवादक पं. नित्यानंद हळदीपूर यांचे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाला लाभणार आहे. संगीत, विचार आणि परंपरेचा संगम घडवणारी ही प्रस्तुती रसिकांसाठी एक वेगळी अनुभूती ठरणार आहे. कार्यक्रम शुक्रवारी, २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील बहुउद्देशीय दालनात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकादमीकडून करण्यात आले आहे. ‘कलेचा आनंद आणि विचारांची मेजवानी’ देणारा हा उपक्रम असल्याने संगीत आणि संस्कृतीप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

0000

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp