Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

सातारा बसस्थानक पुनर्बांधणीचे काम गतीने करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Admin | 2 views
सातारा बसस्थानक पुनर्बांधणीचे काम गतीने करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २५ : सातारा बसस्थानकाच्या पुनर्बांधणी व विस्तारासंदर्भात मंत्रालयात परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बसस्थानकाचे काम सुधारित पद्धतीने आणि गतीने करण्याचे निर्देश परिवहन मंत्री  सरनाईक यांनी यावेळी दिले.

परिवहन मंत्री सरनाईक यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सातारा येथील जुन्या बसस्थानकाच्या जागेवर नव्याने सुसज्ज बसस्थानक उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांची वाढती संख्या, वाहतुकीचा वाढता ताण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानकाचे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बस स्थानकामध्ये बसगाड्यांना प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठीचे गेट एकाच मार्गावर प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र त्यामुळे वाहतुकीस अडचण होणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले. त्यानुसार सुधारणा करण्याचे तसेच वाहतूक सुलभतेसाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण, आणि आवश्यक त्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्री श्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बसस्थानक पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. नवीन इन व आउट गेट, प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा, वाहनतळ व्यवस्था आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सूचना देण्यात आल्या. या बैठकीस परिवहन, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सातारा बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुटसुटीत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी उभय मंत्र्यांनी व्यक्त केला.

0000

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp