
सांगली, दि.२३ (जि. मा. का.) – बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ व अतिवृष्टी या दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्य शासनाने जल व्यवस्थापनासाठी शाश्वत दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन राज्य स्तरावर सुरू असून, सर्वांच्या सहभागाने ते यशस्वी करण्यात येईल. या अनुषंगाने शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीने आयोजित “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” च्या नवव्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वारणाली वसाहतीतील सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, अभिनंदन हारूगडे, के. एल. मासाळ, प्रज्ञा पाटील, हर्षद यादव आणि राजन डवरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत दि. २५ ते २९ एप्रिल या कालावधीत ‘गोदा ते नर्मदा’ अशी यात्रा काढण्यात येणार आहे. यातून जलप्रबोधनाची चळवळ प्रगल्भ होईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, हवामान अंदाजात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने पावसाच्या अनियमिततेचे पूर्वानुमान शक्य होत आहे. या वर्षी जून व जुलै महिन्यांत कमी पाऊस व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जल व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून काटकसरीने वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आणि याबाबत जनप्रबोधनासाठी हा पंधरवडा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देत पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सांगली व कोल्हापूरमधील पूर व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेकडून ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मिरज-लातूर जलदूत एक्स्प्रेस ट्रेनचा दाखला देत त्यांनी शासन विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, उपसा सिंचन योजनांचे पाणी बंद जलवाहिनीद्वारे वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, त्यांना जमिनीचे वार्षिक भाडे दिले जाणार आहे. तसेच, महानगरांमध्ये सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पंधरवड्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या जलव्यवस्थापनातील योगदानाचा उल्लेख केला. पाण्याशिवाय शेती शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतींबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा आणि पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे ते म्हणाले.
नवव्या पुष्पाअंतर्गत पीक पद्धती, उत्पादकता वाढ व पाणी नियोजन या विषयांवर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत पीक पद्धतीत बदल, उत्पादनवाढ आणि जलसंसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात तज्ज्ञ डॉ. सचिन महाजन व डॉ. श्रीमंत राठोड यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन व उत्पादनवाढीच्या उपायांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००
