Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीला गती मिळणार – मंत्री गिरीश महाजन

Admin | 1 views
सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीला गती मिळणार – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि.१८ : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८९ वी बैठक मंत्रालयात जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा नियामक मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध प्रकल्पांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. या मंजूर कामांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर  तोडगा निघणार असून सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीला गती मिळणार असल्याचे जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले.

या बैठकीस अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा

बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील विविध सिंचन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईबाबत माहिती घेतली तसेच प्रलंबित प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्यावर भर

जलसंपदा मंत्री महाजन यांनी प्रकल्पांची कामे करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचे  निर्देश दिली. “सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची हमी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण व्हावीत,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

बैठकीत महत्त्वाच्या व प्राधान्य प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. सिंचन सुविधा वाढल्यास कृषी उत्पादनात वाढ होईल तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

राजू धोत्रे/विसंअ


Join WhatsApp