Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

सिंहस्थ २०२७ पार्श्वभूमीवर विद्युत सुशोभीकरण व एलईडी कामांबाबत कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक

Admin | 2 views
सिंहस्थ २०२७ पार्श्वभूमीवर विद्युत सुशोभीकरण व एलईडी कामांबाबत कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक

नाशिक, ०१ (जिमाका): नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर विद्युत सुशोभीकरण आणि प्रकाशयोजना कामांबाबत नाशिक -त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने शुक्रवारी स्मार्ट सिटी कार्यालय, पंचवटी येथे भागधारकांची समन्वय बैठक पार पडली.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. कुंभमेळा प्राधिकरण अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय यांच्यासह सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महानगरपालिका, त्र्यंबक नगरपरिषद यांचे अधिकारी तसेच संबंधित संस्थांचे प्रतिनिधी आणि अनुभवी प्रकाशयोजना सल्लागार व अंमलबजावणी करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सिंहस्थ काळात प्रमुख घाट, रस्ते, पूल आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या स्ट्रीट लाईट व एलईडी स्थापनेबाबत समन्वित आणि प्रमाणित पद्धती विकसित करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

प्रकाशयोजनेत एकसंध डिझाइन, सौंदर्यात्मक सुसंगती तसेच कार्यात्मक व वास्तुशिल्पीय प्रकाशयोजनेचे वर्गीकरण याबाबत सविस्तर चर्चा झाली. यासोबतच सुरक्षा मानके, आयपी रेटिंग, सर्ज प्रोटेक्शन, संरचनात्मक स्थैर्य, विविध सार्वजनिक क्षेत्रांसाठी आवश्यक लुमेन व लक्स पातळी, ग्लेअर नियंत्रण आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे निकष यांवरही विचारविनिमय करण्यात आला.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ २०२७ साठी सुरक्षित, टिकाऊ आणि दृश्यदृष्ट्या सुसंगत प्रकाशयोजना उभारण्यासाठी प्रारंभीच समन्वय आणि एकसंध तांत्रिक निकष निश्चित करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.

०००


Join WhatsApp