Pune | Sun, 05 April 2026

No Ad Available

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना प्रशासकीय पातळीवर प्राधान्य द्यावे

Admin | 4 views
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना प्रशासकीय पातळीवर प्राधान्य द्यावे

नाशिक, दि. ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू केलेल्या कामांना प्रशासकीय पातळीवर सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी सांगितले की, कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामांना गती देताना प्रशासकीय पातळीवर या कामांना विलंब होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. सर्व विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करून कुंभमेळा यशस्वी करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

साधुग्राम परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य द्यावे. भाविक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ओएफसी केबल नेटवर्क, वाहन व्यवस्थेचे नियोजन करावे. कामांची गती वाढवण्यासाठी अभियंते प्रत्यक्ष कार्यस्थळावर उपस्थित राहणे आवश्यक असून अभियंत्यांच्या देखरेखीखाली कामे झाल्याने कामांचा दर्जा उंचावण्यास मदत होऊन कामांना अपेक्षित गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात सुरु असलेली रस्ते, पूल, रिंग रोड, द्वारका जंक्शन, नवीन घाट बांधणी, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, नवीन डीपी रोड, ओझर विमानतळ व नाशिकरोड, ओढा, कसबे- सुकेणे, खेरवाडी, देवळाली कॅम्प  येथील रेल्वे स्थानकांचा विकास, तेथील पार्किंग, भाविकांसाठी मुलभूत सोयीसुविधा यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांचा यावेळी आढावा घेत या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

त्र्यंबकेश्वर परिसरातील पाणीपुरवठा, वॉटर ग्रीड प्रकल्प, प्रस्तावित घाटांची कामे, तसेच गोदावरी नदीकाठावरील सीवर नेटवर्क व नदीपात्रातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. याशिवाय नाशिक, वणी व त्र्यंबकेश्वर येथील बसस्थानकांची उभारणी आणि जल शुद्धीकरण व मल:निस्सारण प्रकल्पांच्या कामांचाही मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम, पोलीस महानिरिक्षक श्री. कराळे, कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह, महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी तसेच पुरातत्व विभाग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागामार्फत सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीची माहिती बैठकीत दिली.

या बैठकीस मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरूधंती शर्मा, पर्यटन विभागाचे उपसंचालक नंदकुमार राऊत, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक श्री. गोटे, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0000000


Join WhatsApp