
धुळे, दिनांक ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
पालकमंत्री श्री. रावल यांनी आज शिंदखेडा तालुक्यातील टेमलाय, मेथी व धुळे तालुक्यातील लामकानी आदी गावांना भेट देऊन अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात आमदार राघवेंद्र पाटील,दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुरज जगताप, तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषि अधिकारी मनोज सिसोदिया, योगेश सोनवणे, गट विकास अधिकारी सुरेश नेतनराव,मंडळ कृषि अधिकारी बी. के. बोरसे तसेच महसूल व कृषि विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, जिल्हृयात अवकाळी पाऊस,गारपिट व वादळी पाऊसामुळे विविध पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी पंचनामे पारदर्शक व अचुक पद्धतीने करण्यात यावेत. ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे, फळबागांचे तसेच शेतीमालाचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून तातडीने शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री श्री.रावल यांनी शेतकऱ्यांना धीर देतांना म्हटले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे पाठपुरवा करण्यात येईल. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असे सांगितले. तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. पालकमंत्री श्री.रावल यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी काही शेतकऱ्यांनी शेतीच्या नुकसानीबाबत समस्या मांडल्या, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.रावल यांनी दिल्यात.
00000
