Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तत्काळ निकाली काढा

Admin | 1 views
सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तत्काळ निकाली काढा

मुंबई, दि. ०२: गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई तत्काळ देण्यात यावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांनी दिले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत सह्यादी अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, समाज कल्याण उपायुक्त स्वाती इथापे, सामाजिक न्याय विभागाच्या अवर सचिव प्रज्ञा देशमुख, मुंबई शहरचे सहायक संचालक प्रसाद खैरनार, मुंबई उपनगरचे सहायक संचालक रविकिरण पाटील तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल म्हणाले, पीडित कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पात्र कुटुंबांना शासनाच्या तरतुदीनुसार पूर्ण नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी. ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्याला नोकरी देणे अपेक्षित आहे, त्या बाबीही तत्काळ मार्गी लावाव्यात. लाड पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांनी तात्काळ करावी.

ज्या महानगरपालिका अथवा नगरपालिका याबाबत अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. राज्यात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या संख्येसंदर्भातील सविस्तर अहवाल प्रत्येक महानगरपालिका व नगरपालिका यांनी सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तीन महिन्यांनंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असून, ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर म्हणाले, महाराष्ट्रात लाड-पागे समिती यांच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ ज्या सफाई कामगारांना मिळालेला नाही याबाबत कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या नुकसान भरपाई  प्रकरणी  तत्काळ कार्यवाही करावी.

या बैठकीत मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात, सफाई कामगारांच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तसेच प्राप्त झालेल्या तक्रारींवर सविस्तर चर्चा झाली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

 


Join WhatsApp