
महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहावे, यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रभावी योजना राबवत आहे. या योजनांमधून मुली व महिलांना केवळ मोफत उच्च शिक्षणच नव्हे, तर रोजगाराभिमुख व व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचीही व्यापक संधी उपलब्ध करून दिली जात आहे. परिणामी, अनेक महिला आज नोकरी तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
कौशल्य विकास विभागाची पुढाकारपूर्ण योजना
कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेत मुली व महिलांसाठी विशेष आरक्षण देण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थिनींनाही या योजनेत प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. सांगली जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत एक व दोन वर्षांचे विविध अभ्यासक्रम राबविले जात आहेत. या योजनेचा लाभ घेत अनेक महिलांनी प्रतिष्ठित नोकऱ्या मिळवल्या असून, काहींनी स्वतःचे उद्योग उभारून यशाची नवी उंची गाठली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, सांगली येथे (दूरध्वनी: ०२३३-२३१०१३९) संपर्क साधता येईल.
आरसेटीमार्फत मोफत कौशल्य प्रशिक्षण
जिल्हा अग्रणी कार्यालयाच्या समन्वयातून बँक ऑफ इंडिया स्टार आरसेटी, सांगली या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. १८ ते ५० वयोगटातील, आठवी ते दहावी शिक्षण घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. विशेषतः अनुसूचित जाती-जमाती, बचत गट सदस्य, बीपीएल कुटुंबे व विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. या प्रशिक्षणात मोफत निवास, प्रशिक्षण साहित्य, केंद्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र तसेच प्रशिक्षणानंतर दोन वर्षे मार्गदर्शन व बँक कर्जासाठी सहाय्य दिले जाते. अधिक माहितीसाठी (मो. ९१५८५०२०१० / ९६८९७९८००४ / ९८९०१९७३४४) येथे संपर्क साधावा.
नगरपरिषदांकडून स्वयंरोजगाराला चालना
सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमार्फत महिला व बालकल्याणासाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीतून फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर प्रशिक्षण यांसारखे सामूहिक कोर्स राबविले जात असून, महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम केले जात आहे. तसेच अंगणवाडी दुरुस्ती यांसारख्या कामांनाही निधी उपलब्ध करून दिला जातो.
आत्मनिर्भरतेकडे महिलांची वाटचाल
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सांगली जिल्ह्यातील महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची नवी उर्मी निर्माण झाली आहे. कौशल्य, शिक्षण आणि आर्थिक सहाय्याच्या बळावर महिला आता केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता समाजाच्या आर्थिक विकासातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत.
संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
00000
