Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

युवा पिढीच्या हाती मराठी भाषेचं भविष्य सुरक्षित

Admin | 2 views
युवा पिढीच्या हाती मराठी भाषेचं भविष्य सुरक्षित

  • विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी जिंकली युवा वर्गाची मने

कुसुमाग्रज नगरी, नाशिक दि. १ (जिमाका) : आजची युवा पिढी ही अधिक सक्षम आणि संवेदनशील आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग आणि संस्कारांची जाणीव ठेवून वाटचाल केली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यांच्या हाती मराठी भाषेचे भविष्य निश्चितच सुरक्षित असल्याचा सूर आजच्या ‘मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

निमित्त होते, चौथ्या विश्व मराठी संमेलनामध्ये रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित ‘मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग’ या परिसंवादाचे! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांनी यामध्ये सहभाग घेतला. अभिजीत ब्रह्मनाथकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी आजचा युवा विचार कसा करतो, त्याच्यासमोरील आव्हाने, भाषेचे आव्हान ते कसे पेलणार, जागतिक पातळीवर मराठी भाषा पोहोचवण्याचे आव्हान आणि इतर भाषेची नव्या पिढीत झालेली सरमिसळ आदी विविध बाबीवर या दोन्ही वक्त्यांनी या परिसंवादात मनमोकळा संवाद साधला.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठी भाषा नवीन पिढीच्या तोंडी नवे रूप घेऊन येत आहे. त्यात आपल्याला स्थित्यंतर दिसते. अर्थात, मोबाइलच्या अतिवापरामुळे, कुटुंबपद्धती बदलामुळे अनेक प्रश्न समोर उभे ठाकल्याचे त्यांनी नमूद केले.  मोबाईलचा योग्य वापर

आपण कसा करतो, यावरही बरेच अवलंबून आहे. लैंगिक हिंसात्मक मजकूर फिल्म तयार करणाऱ्या टोळ्या जगभरात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे या बाबींचा अतिरेक रोखणे आवश्यक आहे. आजची तरुण पिढी जे लेखन करते, ते आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व असल्याचे त्या म्हणाल्या. प्रेम आणि हिंसा हे एकतर हातात हात घालून चालत आहेत हे थोडस चिंता निर्माण करणारे असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आपण संयुक्त कुटुंब पद्धतीचे उदात्तीकरण करतो. पण हळूहळू चौकोनी आणि नंतर त्रिकोणी कुटुंब झाले आहे.

आता तर बंधन नको वाटतात. संवाद नाही याचे कारण मुलांवर प्रचंड दबाव असल्याचे जाणवते. कुटुंबात लोकशाही नाही हे वास्तव काहीवेळा जाणवते. त्यामुळे  जसजसे मुले मोठे होतात त्यांच्यातील आणि पालकातील संवाद तुटतो. मुलांना त्यांचे पार्टनर निवडण्याचा अधिकार तरी कुटुंबात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जिथे ऑनर किलिंग होते तिथे आदर्शवादी व्यवस्था कशी? आपण एका चौकटीत अडकलो आहोत. त्यामुळे जातीजातीत समाज अडकला आहे. आपण प्रागतिक होऊ, विकास करू, मात्र, समाज एकसंध होणे आवश्यक असल्याची जाणीव त्यांनी उदाहरणासहीत करून दिली.

आजची पिढी बदलली नाही. संवादाची परिभाषा बदलली आहे. शुद्धतेचे अवडंबर नको. त्यांच्या ओठी जी भाषा आहे तीच शब्दातून लेखनाच्या माध्यमातून उतरत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

चंगळवादी संस्कृती ही आजच्या सध्याच्या परिस्थितीची खरी सूत्रधार आहे. स्टेटस सिम्बॉल मुळे अधिक नुकसान होत असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. युवा शक्ती मधे भारत खूप आघाडीवर आहे. पिढी समानता हा विषय चर्चिला जातो. मागील पिढीच्या यशोगाथा नवीन पिढीपुढे आली पाहिजेत.

मराठी भाषा युवक मंडळ स्थापन करणे आणि त्यासाठी अनुदान देणे असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवकांसाठी लिहायला प्रोत्साहन मिळेल असे व्यासपीठ आवश्यक असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

स्त्री पुरुष समानता आवश्यक. वर्ण, लिंग, यातील दूजाभाव बदलला पाहिजे. घरातील कामे दोघांनी केली पाहिजे., अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राजकारणात यशवी होण्यासाठी आश्वासन आणि आशीर्वाद दोन्ही आवश्यक आहेत. युवा शक्ती ही मोठी श्रम शक्ती आणि बौद्धिक शक्ती असल्याचेही त्यांनी आपल्या संवादात सांगितले.

यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक नांगरे पाटील म्हणाले की, आजची जेन झी पिढी ही काळाप्रमाणे बदलणारी आहे. क्रियाशील आहे. कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे कौशल्य या पिढीत जास्त असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

अमेरिकेसारख्या देशात इंटरनेटचा अति वापर आणि त्यामुळे युवा पिढीवर झालेले दुष्परिणाम जगासमोर आहेत. मात्र, आपल्या येथील पिढी ही संस्कारांनी पोसलेली असल्याने त्यांना मागील पिढीच्या कष्टांची जाणीव आहे. त्यामुळेच विचारांशी ही पिढी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भाषा ही प्रवाही असते. संस्कार देणारे घटक कुठे आहेत हे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील आई वडील, शाळा, कॉलेज इथेच संस्कारांची बीजे पेटली जातात. जुनी भाषा आता बदलली आहे. नवीन पिढीच्या ओठी नवे शब्द आहेत.आजची पिढी अधिक कौशल्यपूर्ण आणि कर्तृत्ववान असल्याचे ते म्हणाले.

युवा वर्गाचा निसर्गाशी संवाद महत्त्वाचा आहे. आपले शरीर आणि मन सुदृढ असणे आवश्यक आहे. शब्द, विचार, कृती  चांगल्या आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. पोलीस कायदे आता न्याय संहिता. प्रतिबंधात्मक आणि उपाययोजना या पद्धतीने पोलिसिंग सुरू असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मराठी भाषा यापुढील काळातही नक्की वाढेल., अशा विश्वास व्यक्त करून त्यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या कविते द्वारे आजच्या युवा पिढीला जाणीव करून देत संवादाची सांगता केली.

यावेळी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

०००


Join WhatsApp