Pune | Wed, 04 March 2026

No Ad Available

‘दिलखुलास’मध्ये प्रा. मृदुला दाढे यांची मुलाखत

Admin | 1 views
‘दिलखुलास’मध्ये प्रा. मृदुला दाढे यांची मुलाखत

मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या प्रा. मृदुला दाढे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. सुगम, लोकसंगीत, शास्त्रीय तसेच चित्रपट संगीताच्या अभ्यासक म्हणून त्यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत 5 ते 7 मार्च 2026 दरम्यान दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होईल. तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवरूनही श्रोत्यांना ती ऐकता येणार आहे.निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

प्रा. दाढे यांनी या मुलाखतीत भारतीय शास्त्रीय, सुगम आणि चित्रपट संगीताचा ऐतिहासिक प्रवास उलगडताना विविध घराणी, परंपरा आणि गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. भाषा आणि संगीत यांचे अतूट नाते स्पष्ट करत संस्कृत ते आधुनिक भारतीय भाषांच्या विकासात संगीताची भूमिका त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली आहे. शब्द, लय आणि सूर यांच्या एकत्रित प्रभावातून भावविश्व कसे समृद्ध होते, यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.

चित्रपटसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा परस्परसंबंध, लोकसंगीतातून मिळणारी प्रेरणा, ग्रामीण-शहरी समाजातील संगीताची भूमिका तसेच डिजिटल युगातील संधी-आव्हाने, संगीताचा मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम आणि ताणतणाव कमी करण्यातील त्याची भूमिका याविषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रा. दाढे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

000

जयश्री/कोल्हे/स.सं


Join WhatsApp