
मुंबई, दि. 15 : आगामी काही वर्षांत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले क्वांटम संगणन वेगाने विकसित होत असून जागतिक स्तरावर संशोधन व गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. या प्रगतीमुळे भविष्यातील सायबर सुरक्षेसमोर गंभीर आव्हाने उभी राहत असून यासाठी ‘क्वांटम-सेफ’ म्हणजेच क्वांटम-सुरक्षित धोरणात्मक सज्जता आवश्यक असल्याचे मत आयबीएम रिसर्चचे संचालक अमित सिंघी यांनी व्यक्त केले.
जागतिक क्वांटम दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित परिषदेत क्वांटम सुरक्षा आणि धोरणात्मक सज्जता या विषयावर संचालक सिंघी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी उपस्थित होते. यावेळी क्वांटम संगणक विषयातील जागतिक पातळीवरील घडामोडी, धोके आणि भारतासाठीच्या संधी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

क्वांटम संगणन ही केवळ तांत्रिक क्रांती नसून आर्थिक, औद्योगिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. योग्य वेळी पावले उचलल्यास भारताला या क्षेत्रात आघाडी घेण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे मत सिंघी यांनी यावेळी व्यक्त केले.
अमित सिंघी म्हणाले की, क्वांटम संगणनाचा वापर रसायनशास्त्र, औषधनिर्मिती, शेती, लॉजिस्टिक्स, मशीन लर्निंग तसेच हवामान अंदाज यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. विशेषतः जटिल गणिती समस्या सोडविणे, मोठ्या प्रमाणातील डेटामधून नमुने शोधणे आणि प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करणे यामध्ये या तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती अपेक्षित आहे. आर्थिक क्षेत्रातही क्वांटम संगणनामुळे अचूक अंदाज बांधण्याची क्षमता वाढत असून काही उदाहरणांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक अचूकता सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.
जागतिक स्तरावर क्वांटम संशोधनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असताना भारतात या क्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 2035 पर्यंत भारताला ‘क्वांटम सक्षम अर्थव्यवस्था’ बनविण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले असून त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आल्याचे सिंघी यांनी यावेळी सांगितले.
अमित सिंघी म्हणाले की, सध्या वापरात असलेली सायबर सुरक्षा व्यवस्था ही गणिती कोडिंगवर आधारित असून ती अत्यंत मजबूत मानली जाते. मात्र, या क्वांटम तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर मोठे आव्हानही उभे राहणार आहे. सध्या इंटरनेट, बँकिंग, डिजिटल व्यवहार यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिप्टोग्राफी प्रणाली भविष्यात क्वांटम संगणकांमुळे मोडीत निघू शकतात. त्यामुळे बँकिंग, डिजिटल पेमेंट, ई-मेल, इंटरनेट प्रोटोकॉल, ब्लॉकचेन आणि शासकीय यंत्रणांतील माहिती सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज डेटा सुरक्षित असला तरी भविष्यात तो उघड होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अमित सिंघी म्हणाले की, जगातील विविध तज्ज्ञांच्या मते, 2030 च्या दशकाच्या सुरुवातीस क्वांटम संगणन इतके सक्षम होण्याची शक्यता आहे की ते पारंपरिक क्रिप्टोग्राफी मोडू शकतील. याच पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी ‘पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफी’कडे वाटचाल सुरू केली आहे. या संक्रमणासाठी सर्वप्रथम संस्थांनी आपल्या प्रणालीतील क्रिप्टोग्राफीचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे. त्यानंतर जोखीम मूल्यांकन, धोरण आखणी, अंमलबजावणी आणि सातत्याने निरीक्षण या टप्प्यांमधून ‘क्वांटम-सेफ’ प्रणाली विकसित करावी लागेल. यामध्ये शासकीय यंत्रणा, खाजगी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय मानक संस्था यांचे समन्वित प्रयत्न आवश्यक ठरणार आहेत.
क्वांटम सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर जनजागृती, सशक्त प्रशासकीय यंत्रणा, तांत्रिक क्षमता विकास, संशोधन आणि नवोन्मेष यांना प्राधान्य देणे गरजेचे असून भविष्यातील सायबर सुरक्षेचा पाया आजच मजबूत करणे ही काळाची गरज असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ
