Pune | Thu, 05 March 2026

No Ad Available

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ५ ते ८ मार्चदरम्यान महिला कला महोत्सव २०२६

Admin | 1 views
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ५ ते ८ मार्चदरम्यान महिला कला महोत्सव २०२६

मुंबई, दि. ४  : महिला दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ५ ते  ८ मार्च  दरम्यान “महिला कला महोत्सव २०२६”  या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. नृत्य, नाट्य, संगीत, मुलाखती, छायाचित्र प्रदर्शन तसेच महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री अशा विविध कलाप्रकारांची समृद्ध मेजवानी या महोत्सवात रसिकांना अनुभवता येणार आहे.

५ मार्च रोजी सायं. ६ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर सायं.  ७ वाजता महाभारतात अभिमन्यूच्या वीरगतीनंतर अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिची झालेली मनोवस्था दर्शवणारी नृत्यनाटिका “उत्तरा” सादर होणार असून याचे संकल्पना आणि दिग्दर्शन सोनिया परचुरे यांचे असून, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांचे या नृत्यनाटिकेसाठी विशेष योगदान लाभले आहे. या नृत्यनाटिकेसाठी सादर होत असलेल्या काही रचनांना त्यांनी स्वरबद्ध केले आहे. या नृत्यनाटिकेचे संगीत प्रणव हरिदास यांचे असून, लेखन मुग्धा गोडबोले, काव्य शिवप्रिया सुर्वे यांनी केलेले आहे. यात शरयू नृत्य कलामंदिरच्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. रात्री ८ वाजता मृणालिनी नानिवडेकर, संपादक मल्टीमीडिया, पुढारी माध्यम समूह यांची ‘ “माध्यमप्रमुख ती” ( फिल्ड पत्रकारिता ते माध्यमातील बॉस : एक वेगळ्या वाटेवरचा प्रवास) ही  मुलाखत सुप्रसिद्ध निवेदिका मृण्मयी भजक घेणार आहेत.

६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता ‘ कोलाज क्रिएशन्स,पुणे यांचे “आनंदमठ” हे सुप्रसिद्ध कवी व लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित विनीता तेलंग लिखित आणि रवींद्र सातपुते दिग्दर्शित संगीत नाटक सादर होणार आहे.  नंतर सायं. ५ वाजता – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची महिला सशक्तीकरणासंदर्भात मुलाखत अभिनेत्री संजना पाटील घेणार आहेत. रात्री ७.३० वाजता ‘ “वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे” हा 80 वर्षात सुमारे 8 हजार झाडे लावणाऱ्या आणि जगवणाऱ्या पद्मश्री सालुमरदा थिम्मक्का यांना समर्पित नृत्याविष्कार सादर होणार आहे.  याची संकल्पना  व नृत्य दिग्दर्शन विदुषी शमा भाटे यांनी केलेले आहे.

७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता ”एक तिची गोष्ट” हे फुलवा खामकर व अस्मा खामकर यांचा अभिनय असलेले मराठी नृत्य-संगीत नाटक सादर होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता  संगीतकार आनंदी विकास व सह कलाकार  ”ती चे सूर” हा सरस्वतीदेवी, आनंदघन, उषा खन्ना, उषा मंगेशकर, आनंदी विकास, मीना खडीकर या महिला संगीतकारांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाजलेल्या ८ नाटकातील “संगीत अष्टनायिका” हा दीप्ती भोगले यांची संकल्पना आणि निवेदन वर्षा जोगळेकर असलेला खास कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

सायं ५ वाजता  सुप्रसिद्ध कवियत्री आणि लेखिका अरुणा ढेरे यांच्या “कृष्णकिनारा” या पुस्तकावर आधारित मुक्तनाट्य “मुक्ता” हे मुक्तनाट्य सादर होईल. याची संकल्पना, अभिवाचन, नृत्य दिग्दर्शन अर्चना अनुराधा यांचे असून, स्नेहल दामले यांनी संहिता लेखन, तर संगीतदिग्‍दर्शन सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी  केले आहे. रात्री ८ वाजता भूषण कोरगावकर लिखित आणि दिग्दर्शित “मी कात टाकली” हा खानदानी लावणीचा कार्यक्रम रंगणार आहे. लावणी सम्राज्ञी शबानाबाई अष्टुरकर यांची खरीखुरी प्रेमकहाणी, सोबत पेटी-तबल्यावरची खणखणीत, खानदानी लावणी असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. यात सुप्रसिद्ध लावणी कलाकार गौरी जाधव, पुष्पा सातारकर, गीता वाईकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आपली कला सादर करणार आहेत.

८ मार्च रोजी  सकाळी ११ वाजता  प्रा.चेतक घेगडमल लिखित आणि शिवानी पेडणेकर दिग्दर्शित भारतीय पहिल्या महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर रखमाबाई सावे-राऊत यांच्या जीवनसंघर्षावर आधारित   “रखमाबाई सावे राऊत यांची संघर्ष कहाणी” अर्थात “धि हिंदू लेडी” हे नाटक सादर होणार आहे. दुपारी ३ वाजता विदुषी माधवी नानल यांची संकल्पना असलेला वेगवेगळ्या विषयांवरील रागदारी बंदिशींचा कार्यक्रम “शब्दरंग सूरसंग” सादर होईल. नंतर  सायं ५ वाजता स्त्री गायक-बंदिशकार यांच्या अमूल्य योगदानाला समर्पित असा कार्यक्रम “स्त्री-स्वर-गौरव”, ह्या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन अनुजा झोकरकर यांचे आहे  त्यानंतर रात्री ८ वाजता “आदिम गीतकथा” हा कार्यक्रम सादर होणार आहे, ज्यात आदिवासी स्त्रियांच्या भावविश्वाचे दर्शन घडवणारी संगीतमय कलाकृती महिला राज्य महिला आयोगाच्यावतीने याचे सादरीकरण होणार आहे आणि सादरकर्ते आहेत प्राची माया गजानन.

यंदा आयोजित करण्यात येणाऱ्या महिला कला  महोत्सवाच्या निमित्ताने अकादमीच्या कलांगणात  खासकरून महिलांसाठी ऑन द स्पॉट व्यंगचित्रे आणि फूटमसाज ही विशेष आकर्षणेही उपलब्ध असणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभाग तसेच पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या सहयोगाने महिला दिनाचे औचित्यसाधून खास करून हा कला महोत्सव  साजरा करण्यात येणार आहे. या संपूर्ण महोत्सवाची विशेष बाब म्हणजे हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून इथे सादर करण्यात येणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे. या भव्य सांस्कृतिक पर्वणीचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा विविधांगी मनसोक्त असा आस्वाद घावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी केले आहे.

००००

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp