Pune | Tue, 21 April 2026

No Ad Available

राज्यात आरोग्य अभियानांची व्यापक अंमलबजावणी

Admin | 3 views
राज्यात आरोग्य अभियानांची व्यापक अंमलबजावणी

मुंबई दि.२१ : राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांना विशेष गती मिळाली असून, 31 मार्च 2026 अखेर राज्याने आरोग्य सेवांमध्ये उल्लेखनीय प्रगती साध्य केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या निर्देशानुसार जानेवारी 2026 पासून राज्यभर विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सिकलसेल, बाल आरोग्य, मातृ आरोग्य, क्षयरोग, कुष्ठरोग तसेच असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित करून व्यापक स्तरावर काम करण्यात आले आहे.

अरुणोदय सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान

‘अरुणोदय’ सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान हे राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये 15 जानेवारी 2026 पासून ही मोहीम राबविण्यात आली. शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी व दुर्गम भागांमध्ये घराघरांत जाऊन तपासणी करण्यात आली. 0 ते 40 वयोगटातील तब्बल 74 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 2376  नवीन रुग्ण व 39554 वाहक आढळले. याशिवाय युवकांचे विवाहपूर्व व महिलांचे गर्भधारणेपूर्व समुपदेशन मोठ्या प्रमाणात करण्यात आले, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यात आले. जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान ६०५ हृदय शस्त्रक्रिया आणि ४,२८१ इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या. या उपक्रमामुळे अनेक बालकांना नवजीवन मिळाले असून, बाल आरोग्याच्या दृष्टीने हा मोठा टप्पा मानला जात आहे.

मातृ आरोग्य

मातृ आरोग्याच्या दृष्टीने तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर महिलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. राज्यातील ६,३९३ गरोदर मातांची तपासणी करून त्यापैकी ५,७०४ मातांना आयर्न सुक्रोज किंवा फेरिक कार्बोक्सी माल्टोज उपचार देण्यात आले. या उपचारांमुळे मातामृत्यू कमी होण्यास आणि सुरक्षित प्रसूतीस मोठी मदत होत आहे.

हत्तीरोगाने बाधित रुग्णांसाठीही शस्त्रक्रिया मोहिमेला वेग देण्यात आला. २०२५ मध्‍ये सर्वेक्षणांतर्गत एकूण १७६५ अंडवृध्‍दी शस्‍त्रक्रियेकरीता पात्र रूग्‍णांची नोंद करण्‍यात आली. त्‍यापैकी डिसेंबर २०२५ अखेर एकूण ४६६ अंडवृध्‍दी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या. जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या कालावधीमध्‍ये राबविण्‍यात आलेल्‍या विशेष मोहिमेअंतर्गत १२८९ पात्र रुग्‍णांपैकी ५६३ रुग्‍णांवर अंडवृध्‍दी शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या करण्‍यात आल्‍या

मलेरिया मुक्त गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात ‘मलेरिया मुक्त गडचिरोली’ अभियानांतर्गत प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. १.२१ लाखांहून अधिक रक्तनमुने तपासण्यात आले असून २३१ रुग्ण आढळले आहेत. डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनाखाली टास्कफोर्स कार्यरत असून, कीटकनाशक फवारणी, मच्छरदाण्यांचे वितरण आणि जनजागृती उपक्रमांमुळे मलेरिया नियंत्रणात येत आहे.

क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम

क्षयरोग रुग्णांसाठी पोषण सहाय्य म्हणून फूड बास्केट वाटप मोहिमेअंतर्गत ५.३८ लाखांहून अधिक अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले आहे. तसेच कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ५.३ लाख सहवासितांची तपासणी करून त्यापैकी ९८.६४ टक्के पात्र व्यक्तींना रिफॅम्पिसिनचा प्रतिबंधात्मक डोस देण्यात आला आहे.

असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम

असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात आली. २६ हजारांहून अधिक शिबिरांमधून ३० लाखांहून अधिक नागरिकांची उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात नवीन रुग्णांचे निदान होऊन तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या मोहिमेत १.७३ लाख उच्च रक्तदाब व १.१० लाख मधुमेह रुग्णांचे नव्याने निदान झाले असून, बहुसंख्य रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे दिसून येते. फॉलोअप यंत्रणा सक्रिय असल्याने रुग्णांच्या सातत्यपूर्ण उपचारावर भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान व नियंत्रण साध्य होण्यास मदत होत आहे.

या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता आणि पोहोच लक्षणीयरित्या वाढली असून, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि वेळेवर उपचार यामुळे नागरिकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडून येत आहेत. ‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टाच्या दिशेने महाराष्ट्र ठामपणे वाटचाल करत असल्याचे या मोहिमांमधून स्पष्ट झाले आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ


Join WhatsApp