Pune | Tue, 21 April 2026

No Ad Available

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी टीआरटीआयने प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत पूर्ण करावा -आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

Admin | 1 views
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी टीआरटीआयने प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत पूर्ण करावा -आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. २१ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) मार्फत राबविण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, टीआरटीआयच्या आयुक्त मंजिरी मनोलकर, सहसचिव मच्छिंद्र शेळके, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दर्जेदार व नियोजनबद्ध प्रशिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत पूर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी पुरेसा सराव आणि मार्गदर्शन मिळू शकते. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आदिवासी समाजाशी संबंधित संशोधनावर आधारित विविध प्रकाशने ठराविक कालमर्यादेत नियमितपणे प्रकाशित करण्यात यावीत. या प्रकाशनांमुळे आदिवासी समाजाचा इतिहास, परंपरा अधिक व्यापकपणे पुढे येईल असे मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आदिवासी समाजासाठी कार्य केलेल्या महापुरुषांच्या जयंती व शहीद दिनांची माहिती संकलित करून प्रसिद्ध करण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय, राज्यातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

0000

शैलजा पाटील/विसंअ


Join WhatsApp