
मुंबई, दि.२१:- जे. एन. पी. ए. मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा मच्छीमार सोसायटी तसेच मोरा (ता. उरण जि. रायगड) गावातील मच्छीमार यांच्या झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला आमदार महेश बालदी, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.
मोरा मच्छीमार सोसायटी तसेच मोरा गावातील मच्छीमार यांना नुकसान भरपाई देण्यासाठी याचे वर्गीकरण करून त्याबाबतचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गस्ती नौका, ड्रोन खरेदीचा आढावा
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या पाच गस्ती नौका व ड्रोन खरेदी बाबतचा आढावा घेतला. गस्ती नौका व ड्रोन खरेदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
०००००
एकनाथ पोवार/स.सं.
