
मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 व 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या टूर सर्किटला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, ही केवळ एक पर्यटन संकल्पना नसून, भारताच्या लोकशाहीचा पाया घालणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी कार्य, संघर्ष आणि आदर्श या परिपथाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचला. महाराष्ट्र पर्यटन विभागाने हाती घेतलेला हा उपक्रम, इतिहास, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यांना जोडणारा प्रेरणादायी प्रवास होता. या परिपथामुळे अनुयायी, पर्यटकांना बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली. हा केवळ प्रवास नसून, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट सहल मुंबई, नागपूर, नाशिक येथे आयोजित करण्यात आली. सोमवारी, 13 एप्रिल 2026 रोजी टूर सर्किटचा शुभारंभ झाला. यावेळी पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटनाच्या युवा दूत नवेली देशमुख उपस्थित होत्या. मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून टूर सर्किट उपक्रमाची सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी महान कार्य, त्यांचे जीवनचरित्र, विचार सगळ्या स्तरांतील पर्यटक तसेच नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विभाग करते आहे, मात्र युवकांनीही यात सहभाग घेऊन हे काम यशस्वी केले, त्याबद्दल युवकांचे कौतुक अशी प्रतिक्रिया नवेली यांनी दिली.
मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी हे टूर सर्किट निःशुल्क होती. दोन दिवसीय टूर सर्किटमध्ये प्रत्येक वयोगटातील पर्यटक, नागरिकांनी सहभाग घेतला होता. या टूर सर्किटमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश होता. तर नाशिकमधील मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर ही स्थळे पाहण्यासाठी पर्यटक, अनुयायांनी गर्दी केली. तसेच नागपूर येथील दिक्षाभूमी, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आदी स्थळांना पर्यटकांनी भेट दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास याची माहिती सहल मार्गदर्शकांनी पर्यटकांना दिली. पर्यटन विभागाच्या या उपक्रमाला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
टूर सर्किट अंतर्गत प्रत्येक दिवशी दोन बसेस सोडण्यात आल्या. सहलीमध्ये सहभागी झालेले पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन विभागाद्वारे पुरविण्यात आल्या. पर्यटन विभागामार्फत सर्किटचे योग्य नियोजन करण्यात आले.
0000
संध्या गरवारे / विसंअ
