
मुंबई, दि. २१: कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. या प्रयत्नांचाच भाग म्हणून या राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार कल्याण मंडळाच्यावतीने आयोजित अशा स्पर्धा कामगार व त्यांचे पाल्य, कुटुंबीय यांना नावलौकिक कमविण्याची संधी आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी केले.
हुतात्मा बाबू गेनू मुंबई कामगार क्रीडा भवन येथे औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २९ व्या आणि महिलांच्या २४ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कामगार मंत्री ॲड फुंडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला व्यासपीठावर कामगार राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनिषा कायंदे, आमदार सुनील शिंदे, असंघटित कामगार विकास आयुक्त सुशील खोडवेकर, कामगार आयुक्त एच पी तुम्मोड, उपसचिव रोशनी कदम, सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष डोके, कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्य भाग्यश्री भुर्के, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस विश्वास मोरे, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.

कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगत कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, आतापर्यंत कामगारांच्या ३५ हजार पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. शिशुंसाठी बालक मंदिर, महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण, कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन योजना कामगार कल्याण मंडळ राबवित असते. एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेला लाजवेल अशी व्यवस्था या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल, शूटिंग रेंज आहे. कुठल्याही क्रीडा स्पर्धेमध्ये विजय आणि पराभव असतोच. विजयी झालेल्या खेळाडूंनी आत्मविश्वास टिकून ठेवत पुढील स्पर्धेसाठी तयारी करावी. तसेच पराभव झालेल्या खेळाडूंनी खचून न जाता, पुढील स्पर्धा मीच जिंकेल या आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहनही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी केले.

प्रास्ताविक कल्याण आयुक्त भास्कर मोरडे यांनी केले. त्यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच आमदार कालिदास कोळंबकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. आभार प्रदर्शन उप कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्पर्धेचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते फुगे सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर स्पर्धेत सहभागी असलेल्या संघांनी संचलन केले. उपस्थित खेळाडूंना यावेळी खेळभावनेची प्रतिज्ञा देण्यात आली.
कार्यक्रमाला स्पर्धेत सहभागी असलेले खेळाडू, कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
0000
निलेश तायडे/विसंअ
