Pune | Thu, 16 April 2026

No Ad Available

सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असलेला राज्याचा अर्थसंकल्प – मंत्री अतुल सावे

Admin | 10 views
सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप असलेला राज्याचा अर्थसंकल्प – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि.६ : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असून राज्याच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांना चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.

मंत्री अतुल सावे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासित या चार स्तंभांवर आधारित असून शेती, उद्योग, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्पातून हरित ऊर्जेला चालना देणारे निर्णयही घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजना यांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्याबरोबरच स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचा आधार मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र हरित ऊर्जेच्या दिशेने मोठी पावले टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री सावे म्हणाले की, दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय सेवा, योजना आणि अर्ज प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकत्रित डिजिटल पोर्टल विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना सेवा मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनांमध्ये दिव्यांगांसाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय हा दिव्यांगांच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

तसेच छत्रपती संभाजीनगर शहराला राज्यातील महत्त्वाचे ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचेही मंत्री सावे यांनी नमूद केले. या निर्णयामुळे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

०००

शैलजा पाटील/वि.सं.अ


Join WhatsApp